नागपुरात संतापजनक प्रकार, मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला पोलिसांकडून अटक
नागपूरच्या पाचपावली भागात एका लहान मुलीवर सावत्र बापाने अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आईने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या घटनेचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नागपूरच्या पाचपावली भागात घरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका घरामध्ये १० वर्षांच्या मुलीवर तिच्याच सावत्र बापाकडून वारंवार लांछनास्पद प्रकार घडत असल्याचा दावा केला जात आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरावर संशयास्पद खुणा आढळून आल्यानंतर आईला तिच्या नवऱ्यावर शंका आली. या प्रकाराची खात्री करण्यासाठी आईने अत्यंत चलाखीने टीव्हीच्या मागे एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आणि त्याचे लाईव्ह फुटेज आपल्या मैत्रिणीच्या मोबाईलवर पाहण्याची सोय केली. तब्बल १ वर्ष हे रेकॉर्डिंग सुरू होते आणि यादरम्यान समोर आलेल्या दृश्यांमुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. आरोपी बापाने कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने ती चिमुकली प्रचंड दबावाखाली होती.
या सर्व प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आईने तातडीने पाचपावली पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ पावले उचलत पोक्सो कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अशा प्रकारच्या घटनांमुळे घरातील वातावरण आणि बालकांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत असून, या गुन्ह्यात पुढे कायदेशीर कारवाई कशी होते आणि पीडित मुलीला न्याय कसा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.