← द टाइम्स ऑफ महाराष्ट्र
↗ ☆
नागपूरमध्ये सावत्र वडिलांकडून मुलीवर अत्याचार, आईच्या सतर्कतेमुळे धक्कादायक प्रकार उघडकीस

नागपूरमध्ये सावत्र वडिलांकडून मुलीवर अत्याचार, आईच्या सतर्कतेमुळे धक्कादायक प्रकार उघडकीस

बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ • 01:46 PM • 6.2K वाचले

नागपूरमधील पाचपावली भागात एका १० वर्षांच्या मुलीवर सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आईने घरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नागपूरमधील पाचपावली भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या भागात राहणाऱ्या एका १० वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच सावत्र वडिलांकडून वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पीडित मुलीच्या शरीरावर काही दिवसांपासून संशयास्पद खुणा दिसत असल्याने आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आईने पतीच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली पण नेमका प्रकार स्पष्ट होत नव्हता.

सत्य समोर आणण्यासाठी आईने अत्यंत शक्कल लढवत घरातील टीव्हीच्या मागे गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. या कॅमेऱ्याचे लाईव्ह फुटेज पाहण्याची सोय तिने आपल्या मैत्रिणीच्या मोबाईलवर केली होती आणि जवळपास वर्षभर घरातील हालचालींचे रेकॉर्डिंग सुरू होते. या गुप्त रेकॉर्डिंगमध्ये सावत्र वडिलांकडून मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यानंतर आईने मुलीशी संवाद साधला असता, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

आरोपीने या अंगावर काटा आणणाऱ्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे भीतीपोटी मुलगी इतके दिवस गप्प बसली होती. हा सर्व प्रकार समजल्यानंतर आईने ताबडतोब पाचपावली पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपीविरोधात गंभीर गुन्हे आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आणि न्यायालयात हजर केले असता त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पाचपावली पोलीस करत असून, आईने दाखवलेल्या धैर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पण या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.

स
संपादकीय विभाग
द टाइम्स ऑफ महाराष्ट्र