← द टाइम्स ऑफ महाराष्ट्र
↗ ☆
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हवालदाराकडे सापडली देशी दारूची बाटली, सुरक्षेचा बोजवारा

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हवालदाराकडे सापडली देशी दारूची बाटली, सुरक्षेचा बोजवारा

मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ • 05:47 PM • 5.9K वाचले

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सुरक्षा कर्मचाऱ्याकडेच देशी दारूची बाटली आढळली आहे. या प्रकारामुळे तुरुंग प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

सुधारणा आणि पुनर्वसन हे मुख्य ध्येय असलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बेकायदेशीर वस्तू रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच एका कर्मचाऱ्याकडे अमली पदार्थ आढळल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एका हवालदाराकडे देशी दारूची बाटली सापडली आहे. या सलग प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत असून, सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.

यादव कचरू जाधव (५७) असे देशी दारूची बाटली बाळगणाऱ्या हवालदाराचे नाव असून, तो कारागृहात कार्यरत आहे. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते १० दरम्यान कारागृहातील बराक १ च्या मुख्य प्रवेशद्वारजवळ हा प्रकार घडला. नियमित तपासणी सुरू असताना हवालदार नागराज बाबुलाल आहिरे यांनी यादव जाधव यांची अंगझडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे प्रिन्स संत्रा १८० मिली अशी लेबल असलेली सीलबंद देशी दारूची काचेची बाटली आढळून आली.

कारागृह परिसरात मद्य नेण्यास सक्त प्रतिबंध असतानाही कर्मचाऱ्याकडेच असा ऐवज सापडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार झाडे पुढील तपास करीत आहेत. विशेष म्हणजे, ४ नोव्हेंबर रोजी आणखी एका कर्मचाऱ्याकडे चरस हा अमली पदार्थ आढळून आला होता, ज्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

कैद्यांवर शिस्त लादणाऱ्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडेच प्रतिबंधित वस्तू सापडल्याने अंतर्गत तपासणी यंत्रणेच्या प्रभावीपणावर शंका उपस्थित होत आहे. आता प्रवेशद्वारावरील तपासणी आणि नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजनांचा फेरआढावा घेण्याची गरज निर्माण झाली असून, दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे.

स
संपादकीय विभाग
द टाइम्स ऑफ महाराष्ट्र