नाशिकमधील शिक्षणसंस्था विशेष तपास पथकाच्या रडारवर, शालार्थ घोटाळ्याचे लोण पोहोचले
नाशिकमधील शिक्षणसंस्थांमध्ये बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचे लोण पोहोचले असून, एसआयटीमार्फत कसून चौकशी सुरू आहे. यामुळे संबंधित विभागातील संशयास्पद नियुक्त्यांची कागदपत्रे तपासली जात आहेत.
राज्यभरात खळबळ उडविणाऱ्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचे लोण आता नाशिक शहरापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक बनावट आयडी तयार करून शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता दिल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. यामुळे आता नाशिकमधील शिक्षणसंस्था विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) रडारवर आल्या असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.
संबंधित अभ्यास भागातील संशयास्पद नियुक्त्या, वैयक्तिक मान्यता आणि कागदपत्र्यांच्या व्यवहारांची पाळेमुळे खणून काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चार जिल्ह्यांतील खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित कनिष्ठ महासाविद्यालयांमधील शेकडो अध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या मान्यतेची पडताळणी केली जात आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कागदपत्र गायब असल्याने संशयाला अधिकच बळ मिळाले असून, मूळ संचिका सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या तपासात नियुक्तीच्या जाहिराती, निवड पद्धत, मंजूर पदांची संख्या, नियुक्ती आदेश आणि वेतनासाठी तयार करण्यात आलेल्या नोंदी यांची परस्पर पडताळणी केली जाणार आहे. कागदपत्र्यांमधील विसंगती किंवा संशयास्पद नोंदी आढळल्यास संबंधित संस्थांकडून स्पष्टीकरण मागविले जाऊ शकते. त्यामुळे वर्षानुवर्षे कागदोपत्री व्यवहारांच्या आड दडलेल्या अनियमितता उघड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
एसआयटीच्या तपासात नेमके कोणते धागेदोरे हाती लागतात आणि या कथित घोटाळ्याचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याकडे आता संपूर्ण शिक्षण विभागाचे नजर लागली आहे. बनावट मान्यतांना अधिकृततेचे कवच मिळाले असल्यास त्यामागील जबाबदार व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या धडक पडताळणीमुळे विभागातील संशयित व्यवहारांचे पितळ उघडे पडण्याची चिन्हे आहेत.