नाशिकमध्ये दिवाळीनिमित्त गृहपयोगी वस्तू आणि मोबाईल खरेदीसाठी नागरिकांचा मोठा उत्साह
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या बाजारपेठेत होम अप्लायन्सेस आणि मोबाईल खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. विविध ऑफर्समुळे यंदा बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळी सणाला सुरुवात झाली असून, आनंददायी पर्वाच्या मुहूर्तावर यंदा नाशिकच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. नागरिकांनी फ्रीज, वॉशिंग मशिन्स, टीव्ही, एसी, मायक्रो ओव्हन आणि एअर फ्रायर अशा विविध होम अप्लायन्सेस खरेदीसाठी मोठी पसंती दर्शवली आहे. ग्राहकांचा वाढता उत्साह लक्षात घेत शहरातील विविध शोरूम्सकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
बाजारपेठेत कंपन्या तसेच आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना बोनस वाटप केल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर फ्रीजला सर्वाधिक मागणी असून, निरनिराळ्या कंपन्यांचे १८५ लीटरपासून पुढे तसेच विविध रंगसंगतीमधील फ्रीज उपलब्ध आहेत. तसेच ॲन्ड्राईड टीव्ही, सततच्या उकाड्यामुळे एसी आणि मोबाईल खरेदीकडे नागरिकांचा विशेष कल वाढला आहे. मोबाईल बाजारपेठेत १० हजारां पासून ते २ ते अडीच लाखांपर्यंतचे मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असून, यंदा दिवाळीत २५ ते ३० कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.
ग्राहकांची गरज ओळखून विविध बँका तसेच फायनान्स कंपन्यांकडून क्रेडीट कार्डवर सवलतीसह शून्य व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. शोरूम्सतर्फे देखील ठराविक खरेदीवर विविध गिफ्ट्स आणि दरांमध्ये सवलत दिल्या जात आहेत, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली. यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गृह सजावटीसह दैनंदिन वापरात उपयोगी पडणाऱ्या साहित्याला वाढती मागणी मिळाल्याने बाजारपेठेत मोठे चैतन्य पसरले आहे. आगामी काळात ही तेजी कायम राहण्याची शक्यता असून, व्यापारी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.