निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही;सुनेत्राताईंचे आश्वासन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनी सुनेत्राताई पवार यांनी दिवंगत अजितदादांच्या कार्याला अभिवादन करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनाचा सोहळा यंदा केवळ उत्सव नव्हता, तर तो एका नेतृत्वाच्या आठवणींना अभिवादन आणि नव्या नेतृत्वाच्या जबाबदारीचा स्वीकार करणारा क्षण ठरला. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, दादांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ राजकीय पक्ष म्हणून वाढवले नाही, तर लाखो कार्यकर्त्यांचे कुटुंब म्हणून घडवले. राज्याच्या विकासासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठी आणि कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळे आज राष्ट्रवादी ज्या उंचीवर उभी आहे, त्यामागे दादांचे अथक परिश्रम आणि दूरदृष्टी आहे.
"आज दादा आपल्यात नाहीत, ही वेदना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. पण त्यांनी दाखवलेला मार्ग, त्यांनी रुजवलेली कामाची संस्कृती आणि त्यांनी दिलेला जनसेवेचा मंत्र आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे," असे सांगताना सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना आणि अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे सुनेत्राताईंनी सांगितले. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघटनेत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य संधी देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पक्षवाढीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादीची खरी ताकद ही तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. गावागावात, वाड्या-वस्त्यांमध्ये आणि शहरांमध्ये पक्षाची मुळे अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे.
यावेळी त्यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी बांधिलकी हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मूलभूत तत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, दादांनी उभारलेल्या पक्षाला अधिक बळकट करण्याची क्षमता सुनेत्राताईंच्या नेतृत्वात आहे. दादांचे स्वप्न केवळ सत्तेचे नव्हते, तर मजबूत संघटना आणि जनतेच्या विश्वासावर उभा असलेला पक्ष निर्माण करण्याचे होते. आता त्या स्वप्नाला नवी ऊर्जा देण्याचे काम सुनेत्राताई करत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली.
राष्ट्रवादीच्या २७ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना एक गोष्ट स्पष्टपणे पुढे आली,नेतृत्व बदलले असले तरी विचारांचा प्रवास थांबलेला नाही. दादांनी घडवलेला पक्ष आणि ताईंनी स्वीकारलेली जबाबदारी यामुळे राष्ट्रवादीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा कार्यक्रमानंतर राजकीय वर्तुळात रंगली.