पावसाळी वादळानंतर बारामतीच्या मदतीला जयदादा; अजितदादांच्या कार्यपद्धतीचा वारसा अखंड..!
बारामतीत झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जयदादा पवार यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. नुकसानग्रस्त भागांना भेट देत मदतकार्याला गती देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
बारामती शहर आणि तालुक्यात शनिवारी झालेल्या वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळली, वीजपुरवठा विस्कळीत झाला तर वाहतुकीलाही अडथळे निर्माण झाले. या परिस्थितीची माहिती मिळताच जयदादा पवार यांनी तातडीने विविध नुकसानग्रस्त भागांना भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
बारामती-भिगवण मार्गासह शहरातील विविध भागांमध्ये जाऊन त्यांनी पडलेली झाडे, वाहतुकीवरील परिणाम आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत मदतकार्य अधिक वेगाने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कोणत्याही बाबीकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बारामतीच्या विकास मॉडेलची चर्चा राज्यभर होत असली तरी या विकासामागे संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची कार्यसंस्कृतीही तितकीच महत्त्वाची मानली जाते.
राज्याचे देिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनेक दशकांपासून बारामतीतील विकासकामांना गती देताना जनतेच्या प्रश्नांशी थेट संवाद साधण्याची परंपरा जपली. दुष्काळ, अतिवृष्टी, पूरस्थिती किंवा अन्य नैसर्गिक संकटांच्या काळात प्रशासनासोबत स्वतः मैदानात उतरून परिस्थितीचा आढावा घेण्याची त्यांची कार्यपद्धती बारामतीकरांनी सातत्याने अनुभवली आहे.
याच जनसंपर्क आणि तत्परतेच्या परंपरेचा वारसा आज नव्या पिढीतही दिसून येत आहे. जयदादा पवार यांनी वादळानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली, तर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनीदेखील बारामतीतील परिस्थितीची माहिती घेत प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे प्रभावित झालेल्या भागांबाबत त्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
विशेष म्हणजे, कोसळलेल्या झाडांचे केवळ हटविणे नव्हे तर त्यांचे पुनर्संवर्धन आणि नव्याने वृक्षारोपण करण्यावरही भर देण्यात आला. पर्यावरणाचे नुकसान कमी करत शहराचा हरित समतोल कायम राखण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
बारामतीतील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण, नियमित छाटणी आणि आपत्कालीन यंत्रणांची सज्जता वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
वादळानंतरच्या परिस्थितीत जनतेला दिलासा देणे, प्रशासनाला सतर्क ठेवणे आणि नुकसानग्रस्त भागांचे पुनर्वसन जलद गतीने करणे या तिन्ही बाबींवर भर देत जयदादा पवार यांनी पाहणी दौरा पूर्ण केला. बारामतीकरांच्या अडचणींना प्राधान्य देणारी आणि संकटाच्या काळात प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारी नेतृत्वशैली पुन्हा एकदा या निमित्ताने पाहायला मिळाली.