← द टाइम्स ऑफ महाराष्ट्र
↗ ☆
मुंबई धावणार, महाराष्ट्र घडवणार! उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांचा Dream Runमध्ये सहभाग

मुंबई धावणार, महाराष्ट्र घडवणार! उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांचा Dream Runमध्ये सहभाग

मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ • 12:18 PM • 13.3K वाचले

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉन २०२७च्या Dream Run नोंदणीचा शुभारंभ झाला. स्वतः पहिली नोंदणी करत त्यांनी मुंबईकर, महाराष्ट्रवासीय आणि देशभरातील क्रीडाप्रेमींना फिटनेसच्या या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

आरोग्यदायी जीवनशैली, फिटनेस आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२७च्या Dream Run नोंदणीचा शुभारंभ सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आला. यावेळी सुनेत्रावहिनी पवार यांनी Dream Runसाठी पहिली नोंदणी करत या विशेष उपक्रमात स्वतःचा सहभाग नोंदविला.

गेल्या २२ वर्षांपासून मुंबईच्या धावत्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेली टाटा मुंबई मॅरेथॉन आता केवळ एक क्रीडा स्पर्धा राहिलेली नाही. फिटनेस, सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग आणि पर्यावरण संवर्धन यांना जोडणारी एक मोठी प्रेरणादायी चळवळ म्हणून या मॅरेथॉनने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यंदाची मॅरेथॉन ‘Har Dil Mumbai’ या संकल्पनेतून मुंबईची जिद्द, ऊर्जा, माणुसकी आणि एकजूट अधोरेखित करणार आहे.

सुनेत्रावहिनी पवार यांनी महाराष्ट्रात खेळ आणि व्यायाम हा केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. निरोगी आणि सक्रिय समाज घडवण्यासाठी फिटनेसला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये दरवर्षी वाढत असलेला महिलांचा सहभाग ही आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

मॅरेथॉनचा प्रभाव क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित न राहता पर्यटन, फिटनेस, क्रीडा साहित्य आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांवर होत आहे. यंदाच्या मॅरेथॉनमधून सुमारे साडेसहाशे कोटी रुपयांचे आर्थिक मूल्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे. सामाजिक उपक्रमांसाठी जवळपास ६१ कोटी रुपयांचा निधी उभारणाऱ्या या मॅरेथॉनच्या सामाजिक योगदानाचे सुनेत्रावहिनी पवार यांनी कौतुक केले.

फिटनेससोबत पर्यावरण संवर्धनालाही या उपक्रमात महत्त्व देण्यात आले आहे. ‘Green Bib – Agro-Forestry’ यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश पुढे नेला जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. क्रीडा आणि पर्यावरण यांचा सकारात्मक संगम घडवून आणण्याच्या या प्रयत्नाचेही सुनेत्रावहिनी पवार यांनी स्वागत केले.

शासन, नागरिक, क्रीडा संस्था, प्रायोजक, स्वयंसेवक, धावपटू आणि खासगी क्षेत्र यांच्या एकत्रित सहभागामुळे टाटा मुंबई मॅरेथॉनने गेल्या दोन दशकांत व्यापक लोकचळवळीचे स्वरूप घेतले आहे. १७ जानेवारी २०२७ रोजी Queen’s Necklaceवर पुन्हा एकदा या मॅरेथॉनचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे.

यावेळी सुनेत्रावहिनी पवार यांनी मुंबईकर, महाराष्ट्रवासीय आणि देशभरातील क्रीडाप्रेमींना Dream Runमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रत्येकाचे स्वप्न वेगळे असले तरी ते पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा संदेश त्यांनी दिला. “मी स्वतः या Dream Runचा एक भाग होत आहे, याचा विशेष आनंद आहे,” असे सुनेत्रावहिनी पवार यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यासाठी, आपल्या स्वप्नांसाठी आणि एका फिट व सक्षम महाराष्ट्रासाठी एकत्र धावूया, असा संदेश देत सुनेत्रावहिनी पवार यांनी नागरिकांना या उपक्रमाशी जोडण्याचे आवाहन केले.

‘टाटा मुंबई मॅरेथॉन’च्या यशस्वी आयोजनासाठी Procam International, Tata Group, TCS, IDFC FIRST Bank, सर्व भागीदार, स्वयंसेवक, धावपटू तसेच राज्य शासन आणि मुंबईच्या नागरी प्रशासनाचे सुनेत्रावहिनी पवार यांनी अभिनंदन केले.

स
संपादकीय विभाग
द टाइम्स ऑफ महाराष्ट्र