← द टाइम्स ऑफ महाराष्ट्र
↗ ☆
वारसा विकासाचा, ध्यास जनसेवेचा; उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंची शासकीय रुग्णालयात अनपेक्षित भेट

वारसा विकासाचा, ध्यास जनसेवेचा; उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंची शासकीय रुग्णालयात अनपेक्षित भेट

सोमवार, ०८ जून २०२६ • 01:07 PM • 13.8K वाचले

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता भेट दिली. विविध विभागांची पाहणी करत रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेत त्यांनी आरोग्य व्यवस्थेतील प्रत्येक बाब बारकाईने तपासली.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनदायिनी मानली जाते. विशेषतः गोरगरिबांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय रुग्णालयांवरच मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. त्यामुळे अशा रुग्णालयांमध्ये उपलब्ध सुविधा, उपचारांची गुणवत्ता आणि प्रशासनाची कार्यक्षमता यावर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.

कोणताही गाजावाजा नाही, कोणतेही स्वागताचे कार्यक्रम नाहीत आणि कोणतीही पूर्वसूचना नाही. सुनेत्राताई पवार थेट रुग्णालयात पोहोचल्या आणि त्यांनी विविध विभागांमध्ये जाऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. रुग्णालय परिसरातील स्वच्छता, उपचार सुविधा, औषधांचा साठा, वैद्यकीय यंत्रणा, कर्मचारी व्यवस्था आणि रुग्णांच्या अडचणी याबाबत त्यांनी माहिती घेतली.

पाहणीदरम्यान त्यांनी अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत प्रत्यक्ष अनुभव जाणून घेतले. उपचार प्रक्रियेत काही अडथळे येत आहेत का, आवश्यक औषधे वेळेवर मिळतात का, तसेच रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत याची माहिती त्यांनी घेतली.

बारामतीच्या विकास प्रवासात आरोग्य क्षेत्राला नेहमीच विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये धाव घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर सातत्याने भर देण्यात आला. त्या परंपरेला पुढे नेत सुनेत्राताई पवार यांनी आरोग्य सेवांवर स्वतः लक्ष केंद्रित केल्याचे या पाहणीतून दिसून आले.

बारामतीकरांसाठी अशा अचानक पाहण्या नवीन नाहीत. राज्याचे देिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कार्यशैलीही अशीच राहिली आहे. एखाद्या कामाचा अहवाल टेबलावर पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. विकासकामे, शासकीय कार्यालये, रुग्णालये, शैक्षणिक संस्था किंवा सार्वजनिक सुविधा प्रत्येक ठिकाणी बारकाईने लक्ष देण्याची त्यांची पद्धत होती.

आज सुनेत्राताई पवार यांच्याकडूनही त्याच कार्यसंस्कृतीचे स्मरण होत आहे. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, सार्वजनिक यंत्रणा जबाबदारीने काम करावी आणि शासनाच्या सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले.

आरोग्यसेवेत कोणतीही त्रुटी राहू नये, उपचारासाठी आलेल्या रुग्णांना भटकंती करावी लागू नये आणि आवश्यक सेवा वेळेत मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आल्याची माहिती मिळाली.

अचानक झालेल्या या पाहणीमुळे रुग्णालय प्रशासन अधिक सजग होणार असून सेवा व्यवस्थेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताशी संबंधित विषयांवर प्रत्यक्ष लक्ष देण्याची भूमिका घेत सुनेत्राताई पवार यांची जनतेच्या आरोग्याविषयीची आपली बांधिलकी पुन्हा दिसून येत आहे.

स
संपादकीय विभाग
द टाइम्स ऑफ महाराष्ट्र