२५ वर्षांनंतर फलटणमध्ये कापसाची लागवड वाढली; यंदा ८७८ हेक्टरवर पीक
बोंडअळी आणि कीड-रोगांमुळे घटलेली फलटण तालुक्यातील कापूस शेती गेल्या सात-आठ वर्षांत पुन्हा वाढत आहे. यंदा ८७८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
फलटण तालुक्यात कापूस शेती पुन्हा वाढू लागली आहे. बोंडअळी आणि इतर कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे सुमारे २५ वर्षांपूर्वी जवळपास नामशेष झालेल्या या पिकाखालील क्षेत्रात गेल्या सात-आठ वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. यंदा तालुक्यात ८७८ हेक्टरवर कापूस लागवड झाली.
‘पांढरे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला पूर्वी कीड-रोगांचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड कमी केली होती. आता शेतकरी पुन्हा कापूस लागवडीकडे वळत आहेत. त्यामुळे तालुक्यातील क्षेत्रात हंगामागणिक वाढ होत असल्याचे चित्र आहे.
यंदा लागवड ८७८ हेक्टरपर्यंत पोहोचली असून, हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने उत्पादकांना दिलासा मिळत आहे. कापसाच्या दरातील या स्थितीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा या पिकाकडे पुन्हा कल वाढत आहे.